Saroj Khan : श्रीदेवी-माधुरीला बनवलं डान्स क्वीन, सलमान खानसोबत झाला होता वाद; असा होता सरोज खान यांचा थक्क करणारा प्रवास
Saroj Khan : व्यावसायिक आयुष्यात मोठे यश मिळवणाऱ्या सरोज खान यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले.

Saroj Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी आपल्या अप्रतिम नृत्यदिग्दर्शनाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक दिग्गज अभिनेत्रींना नृत्याचे धडे देणाऱ्या सरोज खान यांचा प्रवास मात्र संघर्षमय होता. व्यावसायिक आयुष्यात मोठे यश मिळवणाऱ्या सरोज खान यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले.
निर्मला नागपाल होते खरे नाव
सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी मुंबईत एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव निर्मला नागपाल होते. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी ‘नजराना’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
वयाच्या १३ व्या वर्षी ४३ वर्षीय व्यक्तीशी विवाह
सरोज खान यांनी १९६१ मध्ये वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याशी विवाह केला. त्यावेळी सोहनलाल ४३ वर्षांचे होते. ते आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुलेही होती.
दोघांच्या वयातील मोठ्या अंतरामुळे या विवाहाची त्यावेळी बरीच चर्चा झाली. मात्र, १९६५ मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी सरदार रोशन खान यांच्याशी दुसरे लग्न केले आणि इस्लाम धर्म स्वीकारला.
दोन हजारांहून अधिक गाण्यांचे केले नृत्यदिग्दर्शन
सरोज खान यांनी १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटातून स्वतंत्र नृत्यदिग्दर्शिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी दोन हजारांहून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले.
‘हवा हवाई’, ‘एक दो तीन’, ‘धक धक करने लगा’, ‘चोली के पीछे’, ‘निंबोडा’, ‘डोला रे डोला’ आणि ‘बरसो रे’ यांसारखी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.
बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना शिकवले नृत्य
सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन, रेखा, शर्मिला टागोर, माला सिन्हा, करिश्मा कपूर, करीना कपूर आणि सनी लिओनी यांसारख्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना नृत्याचे धडे दिले. त्यांच्या नृत्यदिग्दर्शनाचे बॉलिवूडमध्ये मोठे कौतुक झाले.
सलमान खानलाही सुनावले होते खडे बोल
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सरोज खान आणि सलमान खान यांच्यात मतभेद झाल्याचे सांगितले जाते. सरोज यांनी आमिर खानला सलमानपेक्षा अधिक डान्स स्टेप्स दिल्याचा सलमानचा आक्षेप होता.
एका प्रसिद्ध न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सरोज खान यांनी या प्रसंगाचा खुलासा केला होता. सलमानने रागाच्या भरात मोठा स्टार झाल्यानंतर त्यांच्यासोबत कधीही काम करणार नसल्याचे म्हटले होते.
सरोज खान यांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले असले तरी त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हात टेकले नाहीत. उलट स्वत:च्या बळावर त्यांनी सिनेइंडस्ट्रीत आपले नाव कमावले.





