Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली “मी प्रत्येक गोष्टीचा…”
Karishma Tanna: कतरिना कैफच्या ट्रोलिंगनंतर करिश्माची पोस्ट चर्चेत

Karishma Tanna: अभिनेत्री करिश्मा तन्नाने २९ जुलै रोजी मुलाला जन्म दिला. आता दीड महिन्यांनंतर करिश्माने तिचे फोटो शेअर करत सध्याची तिची फिगर दाखवली आहे. यामध्ये तिचं पोट बाहेर असलेलं दिसत आहे.
इनस्टाग्रामवर पोस्ट करत तिने लिहिले, “हे आहे माझं डिलिव्हरीनंतरचं (पोस्टपार्टम) शरीर आधीपेक्षा अधिक मुलायम, कर्व्ही आणि आकाराबाहेर गेलेलं… पण मी यातील प्रत्येक गोष्टीचा मनापासून स्वीकार करत आहे. माझं शरीर पुन्हा आधीसारख्या शेपमध्ये आलं आहे असं ज्यांना वाटतं, त्या सर्वांचे आभार.
‘माझ्या या शरीराने एका जीवाला जन्म दिला’
मला खरोखरच या कौतुकाचा आनंद होतो कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर, कौतुक ऐकायला मला खूप आवडतं. पण तुम्हाला जे वरून दिसतंय त्यामागे माझं शरीर अजूनही अनेक बदलांमधून जात आहे. मला ‘ती खरंच गरोदर होती का?’ अशाही कमेंट्स ऐकायला मिळाल्या आहेत.
खरं तर, यात जेनेटिक्सचा मोठा वाटा असतो. मी मुळातच उंच, स्ट्राँग आणि सडपातळ आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की माझ्या शरीरात कोणताही मोठा बदल झाला नाही. माझ्या या शरीराने एका जीवाला जन्म दिला आहे. माझ्या बाळाला ९ महिने पोटात सांभाळलं आहे आणि त्याला या जगात आणलं आहे. आणि आता, हे शरीर हळूहळू, अत्यंत सुंदरपणे स्वतःच्या वेगाने पूर्वपदावर येत आहे.
View this post on Instagram
‘मी अभिमानाने मिरवते…’
हे माझं शरीर आहे, कोणाला पुरावा देण्यासाठी नाही. सैल झालेली त्वचा, शरीराचे बदललेले आकार, वाढलेलं वजन… या सर्व गोष्टी मी अभिमानाने मिरवते. ज्या प्रत्येक आईच्या शरीरात बदल झाले आहेत, त्यांना माझं सांगणं आहे. जगाला तुम्हाला घाई करायला लावू देऊ नका, तुम्हाला जज करू देऊ नका किंवा तुम्हाला कमी लेखू देऊ नका.
कोणालाही कमबॅक करून दाखवण्याचं बंधन आपल्यावर नाही. आपण संयम, प्रेमळपणा आणि अफाट आदरास पात्र आहोत. या शरीराने एक चमत्कार घडवला आहे आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो,’ असे म्हणत करिश्माने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, कतरिना कैफचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मुलाच्या जन्मानंतर ती पहिल्यांदाच सर्वांसमोर आली होती. मात्र सोशल मीडियावर तिच्या वाढलेल्या वजनावरुन तिला ट्रोल करायला सुरुवात झाली. यावरुन सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले. याचदरम्यान करिश्मा तन्नाने केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे.
हेही वाचा





