Jackie Shroff : तो निर्णय चुकीचा ठरला; कर्ज फेडण्यासाठी विकावं लागलं घर, प्रसिद्ध अभिनेत्याचा कठीण काळ
Jackie Shroff : जॅकी श्रॅाफ यांना एका निर्णयामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.

Jackie Shroff : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून प्रवास करत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं. अभिनेता जॅकी श्रॉफ यांची कहाणीही अशाच प्रकारची राहिली आहे.
अभिनेत्याने मुंबईच्या चाळीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेले. मात्र, आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सगळं काही सुरुळीत सुरू असताना जॅकी श्रॅाफ यांना एका निर्णयामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. जेवढं काही कमावलं होतं ते एका क्षणात संपलं.
१९८२ मध्ये ‘स्वामी दादा’ या सिनेमातून जॅकी श्रॉफ यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीने वेग घेतला. आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे, दमदार अभिनयामुळे आणि सहज अभिनयशैलीमुळे ते अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. बॅालिवूडमध्ये त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.
मात्र, अभिनय क्षेत्रात यशस्वी कारकीर्द सुरू असतानाच जॅकी श्रॉफ यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली आणि सिनेमा निर्मितीत पाऊल ठेवलं. त्यांच्या बॅनरखाली ‘जिस देश में गंगा रहता है’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करू शकला नाही.
यानंतर जॅकी श्रॉफ यांनी ‘बूम’ या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमातून कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. मात्र, मोठ्या कलाकारांची फौज असूनही सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर फारसं मोठं यश मिळवता आलं नाही.
एकापाठोपाठ एक सिनेमे अपयशी ठरल्याने जॅकी श्रॉफ यांच्या निर्मिती व्यवसायावर मोठा आर्थिक परिणाम झाला. त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की, कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपलं घर विकावं लागलं.
या आर्थिक संकटाचा परिणाम त्यांच्या करिअरवरही झाला. एकेकाळी प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जॅकी श्रॉफ यांना काही काळ छोट्या आणि सहाय्यक भूमिकांमध्ये काम करावं लागलं. मात्र, या कठीण काळातही त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांनी पुन्हा आपल्या अभिनय कारकिर्दीला उभारी देण्याचा प्रयत्न केला.
जॅकी श्रॉफ यांची ही कहाणी केवळ बॉलिवूडमधील एका अभिनेत्याच्या यश-अपयशाची कथा नाही, तर संघर्ष, प्रसिद्धी, उदारता, चुकीचे आर्थिक निर्णय आणि पुन्हा उभं राहण्याच्या जिद्दीची कहाणी आहे. चाळीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आणि आर्थिक संकटानंतरही त्यांनी अभिनय क्षेत्रातील आपली ओळख कायम ठेवली आहे.






