Rajesh Sharma: शूटिंगदरम्यान किडा चावला अन् प्रकृती बिघडली; अभिनेता राजेश शर्मा रुग्णालयात, डॉक्टरांकडून कसून उपचार
Rajesh Sharma डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग आणखी वाढल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका आहे. या गुठळ्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे डॉक्टर प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत निश्चित काही सांगणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Rajesh Sharma: बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना एका विषारी किड्याने चावल्यामुळे त्यांच्या शरीरात संसर्ग वेगाने पसरला आहे. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
ही माहिती बंगाली अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका सुदीपा चॅटर्जी यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांच्या माहितीनुसार, ही घटना हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये घडली. प्रभासच्या ‘स्पिरिट’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना राजेश शर्मा यांना उजव्या पायाला एका किड्याने चावा घेतला. सुरुवातीला ही साधी घटना असल्याचे वाटल्याने त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे तातडीने वैद्यकीय उपचारही घेण्यात आले नाहीत.
मात्र, काही तासांनंतर परिस्थिती बदलू लागली. सुमारे सहा तासांनी त्यांच्या उजव्या पायात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सूज वाढू लागली आणि शरीरात संसर्ग पसरल्याची लक्षणे दिसू लागली. तरीही त्यांनी नियोजित कार्यक्रमानुसार हैदराबादहून कोलकात्याकडे विमानाने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांना तीव्र ताप आला आणि श्वास घेण्यासही त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली.

Rajesh Sharma
कोलकात्यात पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ढाकुरिया येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत त्यांच्या उजव्या पायात संसर्ग झपाट्याने पसरल्याचे आढळले. पायाच्या बोटांपासून गुडघ्यापर्यंत विषाचा परिणाम झाल्याने वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. सध्या त्यांना अतिदक्षता देखरेखीखाली ठेवण्यात आले असून आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग आणखी वाढल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका आहे. या गुठळ्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे डॉक्टर प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत निश्चित काही सांगणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
राजेश शर्मा हे बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय सहाय्यक अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. गंभीर, विनोदी आणि भावनिक अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या आहेत. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले आहे.
सध्या राजेश शर्मा हे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री तृप्ती डिमरीही झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
राजेश शर्मा यांच्या प्रकृतीची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबतची पुढील अधिकृत माहिती रुग्णालयाकडून वैद्यकीय तपासणीनंतर जाहीर केली जाणार आहे. सर्वांच्या नजरा आता त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याकडे लागल्या आहेत.





