Daler Mehndi : गायक दलेर मेहंदींच्या अपमानावर अनुपम खेर नाराज; थेट म्हणाले…
सांस्कृतिक कार्यक्रमात पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा सार्वजनिकरीत्या अपमान केल्याबद्दल अभिनेता अनुपम खेर यांनी उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्यावर जोरादार टीका केली.

Daler Mehndi – सांस्कृतिक कार्यक्रमात पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा सार्वजनिकरीत्या अपमान केल्याबद्दल अभिनेता अनुपम खेर यांनी उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्यावर जोरादार टीका केली. मंचावर जाऊन सर्वांसमोर अपमान करण्याऐवजी खाजगीत आदराने आक्षेप मांडता आला असता, असे अनुपम खेर यांनी म्हटले.
उत्तराखंडमधील न्यू टिहरी येथे नुकत्याच झालेल्या सिद्धपीठ माँ कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळ्यात मेहंदी सादरीकरण करत असताना उनियाल यांनी मंचावर जाऊन कार्यक्रम थांबवला. गायक दलेर मेहंदी मद्यधुंद असल्याचा आरोप त्यांनी केला.
या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. दलेर मेहंदी यांना आपण २५ ते ३० वर्षांपासून ओळखत असून, ते मद्यपान करत नसल्याचे आपल्याला वैयक्तिकरीत्या माहीत आहे, असे खेर यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओत सांगितले. मेहंदी हे आपल्या परिचयातील सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रकारे कोणावरही आरोप करणे अयोग्य असल्याचे सांगत खेर यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मेहंदी यांच्या समर्थनार्थ पुढे येण्याचे आवाहन केले. गायक मीका सिंग, विनोदी कलाकार कपिल शर्मा आणि रॅपर बादशाह यांनीही या घटनेवर टीका केली आहे.





