Nora Fatehi Accident : अभिनेत्री नोरा फतेहीचा मुंबईत अपघात, मद्यधुंद चालकाची कारला धडक, नेमकं काय घडलं?

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिचा शनिवारी (२० डिसेंबर) मुंबईत कार अपघात झाला आहे. ती अमेरिकन डीजे डेव्हिड गुएटाच्या कॉन्सर्टसाठी सनबर्न फेस्टिव्हल २०२५ला जात होती, त्यावेळी एका मद्यधुंद ड्रायव्हरने तिच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात नोराच्या डोक्याला मार लागला असून सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेही सनबर्न फेस्टिव्हलला जात असताना, एका मद्यधुंद कार चालकाने तिच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत तिच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर नोराच्या टीमने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी आणि उपाचर केल्यानंतर, नोरा फतेही हिला सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, परंतु नोराने कामावर परतण्याचा आग्रह धरला आणि ती सनबर्न २०२५ मध्ये तिच्या सादरीकरणासाठी निघूनही गेली.
या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर नोराच्या चाहत्यांमध्ये चिंतेची लाट उसळली. अपघातानंतर तिच्या कारचे नुकसान झालेल्या फोटोही समोर आले आहेत. नोरा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही सक्रिय आहे. तिचा डेव्हिड गुएटा आणि सियारा सोबतचा नवा ग्लोबल सिंगल लवकरच येणार आहे, ज्यात तिने व्होकल्स दिले आहेत.





