मंचर- श्रावण महिना सुरू झाल्याने चिकनला उठाव नसल्यामुळे बाजारभाव गडगडले आहेत. किरकोळ विक्रेते बॉयलर कोंबडी 120 ते 130 रुपये किलो दराप्रमाणे विकत आहेत. चिकनपेक्षा तरकारी महाग असल्याचा प्रत्यय ग्राहकांना येत आहे. आषाढ महिन्यामध्ये बॉयलर कोंबडीचे दर 180-190 रुपये होते.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे तरकारी मालाचे प्रचंड नुकसान झाले होते. सध्या पावसाचे वातावरण निवळल्यामुळे तरकारी माल चांगला भाव खाऊ लागला आहे. त्या तुलनेत सध्या बॉयलर चिकनचे बाजारभाव गडगडले आहेत. चिकन पेक्षाही तरकारी माल महागड्या दराने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे. ट्रेडर (होलसेल विक्रेते) 52 ते 53 रुपये बाजारभावाने कोंबडी खरेदी करीत आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांच्या माध्यमातून बॉयलर कोंबडी तयार करणारे शेतकरी तसेच कंपन्या बॉयलर कोंबडीचे दर कमी झाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे निरगुडसर येथील उत्पादक पोल्टी व्यवसायिक प्रकाश वळसे पाटील आणि कळंब येथील व्यवसायिक प्रमोद पिंगळे, अक्षय वायाळ यांनी सांगितले.
चिकनचे बाजारभाव किरकोळ विक्रीच्या तुलनेत बॉयलर कोंबडीचे लिफ्टिंग रेट घसरले आहेत. हिंदू धर्मामध्ये श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असल्यामुळे बॉयलर कोंबडीला मागणी कमी प्रमाणात असते. त्याचाच परिणाम दरावर झाला आहे. बाजारामध्ये मालाचा पुरवठा जास्त झाल्याने आणि चिकन शौकीन कमी असल्याने बॉयलर कोंबडीच्या दरात प्रचंड घसरण झाल्याचे कळंब येथील चिकन व्यवसायिक ख्वाजा गरीब नवाज एग्ज सेंटरचे मालक इसाक शेख यांनी सांगितले.