Boeing Layoffs : बोइंगमध्ये पुन्हा नोकरकपात! ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
Boeing Layoffs : विमान उत्पादक कंपनी बोइंगमध्ये पुन्हा नोकरकपात होणार आहे. कमर्शियल एअरक्राफ्ट विभागातील ५ टक्के कर्मचारी कमी केले जाणार असून डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू होईल.

Boeing Layoffs : जगातील आघाडीची विमान आणि लष्करी यंत्रणा तयार करणारी कंपनी बोइंगमध्ये पुन्हा एकदा नोकरकपात होणार आहे. कंपनी आपल्या कमर्शियल एअरक्राफ्ट विभागातील सुमारे ५ टक्के कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे. उत्पादनाचा वेग कंपनीच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. सीएनबीसीच्या वृत्तानुसार, कमर्शियल एअरक्राफ्ट विभागाच्या प्रमुख स्टेफनी पोप यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशातून ही माहिती दिली.
कंपनी कर्मचारी कपात दोन पद्धतींनी करणार आहे. यामध्ये काही कर्मचारी स्वतःहून नोकरी सोडतील, तर काही कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कामावरून कमी केले जाईल. स्टेफनी पोप यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, विमानांच्या उत्पादनाचे वेळापत्रक बदलल्याने आणि उत्पादनाचा वेग कमी झाल्याने सध्या कंपनीकडे गरजेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यामुळे सुधारित व्यवसाय योजनेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागणार आहे. या निर्णयाची माहिती डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
अमेरिकेतील काही राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यापूर्वी कंपन्यांना ६० दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. बोइंगच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीच्या कमर्शियल एअरक्राफ्ट विभागात ५० हजार ४९४ कर्मचारी कार्यरत होते.
दर महिन्याला ५२ विमानांच्या उत्पादनाचे लक्ष्य
बोइंग सध्या आपल्या लोकप्रिय ७३७ मॅक्स विमानांच्या उत्पादनाचा वेग स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी केली ऑर्टबर्ग यांनी गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना सांगितले होते की, पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत या विमानांच्या उत्पादनात मोठी वाढ केली जाणार नाही.
विमानांचे पंख तयार करण्याचे काम अपेक्षेपेक्षा संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे उत्पादन वाढवण्यात अडचणी येत आहेत. सध्या बोइंग दर महिन्याला सुमारे ४७ विमाने तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. २०२७ च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत हा आकडा दरमहा ५२ विमानांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
७३७ विमान कंपनीसाठी सर्वाधिक कमाईचे साधन
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बोइंगचे ७३७ हे कंपनीचे सर्वाधिक कमाई करून देणारे विमान आहे. त्यामुळे या विमानांचे उत्पादन वाढवणे कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी महत्त्वाचे आहे.
दरम्यान, ७८७ वाइडबॉडी विमानांचे उत्पादन वाढवतानाही कंपनीला अडचणी येत आहेत. सध्या दर महिन्याला आठ विमानांचे उत्पादन केले जाते. ते दहापर्यंत नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. याशिवाय ७६७ आणि ७७७ विमानांच्या उत्पादन कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. उत्पादनातील या अडचणींमुळे कंपनीला कर्मचारी संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.





