Shirur News : कवठे येमाई बसस्थानकाजवळ आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावच्या बसस्थानकाच्या मागील कट्यावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवार दि. ०४ सप्टेंबर रोजी दुपारी साधारण दोन वाजता ही घटना उघडकीस आली.
कवठे येमाई गावचे पांडुरंग सुरेश भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कार्यालयात ते असताना गावातील नागरिक निलेश ढोबळे यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, “बसस्थानकाच्या मागील कट्यावर एक अनोळखी इसम हालचाल न करता पडलेला आहे व त्याच्या अंगावर मुंग्या लागलेल्या आहेत.”
त्यानंतर घटनास्थळी ते आले असता, अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाचा अनोळखी पुरुष मृतावस्थेत पडलेला आढळून आला. त्यांनी तत्काळ माहिती टाकळी हाजी पोलिस दुरक्षेत्राला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह अँब्युलन्सद्वारे शिरूर ग्रामीण रुग्णालयात हलवला.
या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून, पुढील तपास पो.हवा शरद वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे कवठे येमाई परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.





