Shikrapur News : बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला
Shikrapur News : दिवसभर ग्रामस्थ व शिक्रापूर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अखेर त्या बालकाचा मृतदेह एका तळ्यात मिळून आला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिक्रापूर : पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील माळवस्ती परिसरातील देवांश विशाल धुमाळ हा चार वर्षीय बालक दुपारी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. दिवसभर ग्रामस्थ व शिक्रापूर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अखेर त्या बालकाचा मृतदेह एका तळ्यात मिळून आला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंपळे खालसा येथील माळवस्ती येथे देवांश धुमाळ हा चार वर्षे बालक दुपारच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ देवांश घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी माहिती दिल्याने ग्रामस्थांनी परिसरात देवांशचा शोध सुरू केला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, हवालदार नवनाथ नाईकडे, आत्माराम तळोले, चंद्रकांत काळे, गणेश करपे, नरेंद्र गायकवाड, पोलीस शिपाई मच्छिंद्र निचित, राम जाधव, लखन शिरसकर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने बेपत्ता देवांशचा शोध सुरू केला, दिवसभर त्या बालकाचा शोध घेतल्यानंतर अखेर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवांशचा मृतदेह घरा शेजारील एका तळ्यामध्ये मिळून आला. याबाबत वैभव रघुनाथ धुमाळ यांनी पोलिसांत खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी हे करीत आहेत.
दोन वर्षांपूर्वी वाचला अखेर नियतीने हिरावला
पिंपळे खालसा येथील तळ्यामध्ये मृतदेह आढळून आलेला देवांश धुमाळ हा बालक दोन वर्षांपूर्वी येथील चासकमान कालव्यामध्ये बुडाला होता. मात्र, सुदैवाने त्यावेळी तो बचावला. आजअखेर घराशेजारील तळ्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.





