गुजरातमध्ये बोटीला अपघात; पालघरमधील 4 मच्छिमार खलाशांचा मृत्यू

पालघर : खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमध्ये निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे. या अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे. या अपघातात मृत्यू पावलेले चारही खलाशी हे पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत. अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा अशी मृतांची नावे आहेत. तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात मधील नामे निराली ही बोट 18 फेब्रुवारी रोजी दहा खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीतून एकूण सात खलाशी प्रवास करीत होते. अपघात झाला तेव्हा ते खोल समुद्रात होते. मच्छिमारी करून परतत असताना या बोटीला दुर्घटना झाली.
या अपघाताची माहिती मिळताच त्यांना वाचवण्यासाठी बचाव मोहिम राबविण्यात आली. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी हे रोजगारासाठी गुजरात मधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. मात्र या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





