Padma Shri Bhiklya Dhinda : पालघरच्या आदिवासी मातीतील सुरांनी आज संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कार यादीत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ आदिवासी कलाकार भिकल्या लडक्या धिंडा यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. तारपा वाद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या धिंडा यांना हा सन्मान मिळाल्याने संपूर्ण आदिवासी समाजात आनंदाचं वातावरण आहे. यापुढे ‘तारपा वादक भिकल्या धिंडा’ ही ओळख ‘पद्मश्री भिकल्या धिंडा’ अशी नवी ओळख घेऊन येणार आहे. त्यांच्या वादनातून निर्माण होणारे स्वर हे केवळ संगीत नसून, वारली आदिवासी संस्कृतीची ओळख, नाळ आणि आत्मा आहेत. दीडशे वर्षांची परंपरा आज या सन्मानाच्या रूपाने फळाला आली असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये पालघर जिल्ह्याचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे. ८९ वर्षीय भिकल्या लडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तारपा वाजवत केला आनंद व्यक्त : दरम्यान, पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भिकल्या धिंडा यांनी तारपा वाजवत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, माझे आजोबा पिंजोबा यांच्याकडून ही कला मला देण आहे, मी लहान असताना गुरंढोरं चरायला जायचो, तेथेच मला तारपा बनवायचा नाद लागला. गुरंढोरांसोबतच मला तारपा वाजवण्याचा छंद लागला तो छंद आदिवासींची संस्कृती जोपासण्यासाठी मी आजही जपतो. नुसता जपत नाही तर मी अनेक तरुणांनाही तारपा वाद्य वाजवायला शिकवलं आहे. तसेच आजच्या मोबाईलच्या युगात तरुण जास्त संस्कृतीकडे लक्ष देत नाहीत. मात्र, मी तो प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले. कोण आहेत भिकल्या लडक्या धिंडा? पालघर जिल्ह्याचे जव्हार तालुक्याचे ज्येष्ठ आदिवासी कलाकार भिकल्या लडक्या धिंडा यांना २०२६ चा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वलवंडे गावाचे रहिवासी असून ते वारली आदिवासी संस्कृतीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. अवघ्या १०व्या वर्षापासून त्यांनी तारपा वादनाची साधना सुरू केली. लहानपणी रानात गुरे चारताना तारपाच्या सुरांशी त्यांची मैत्री जुळली. आज वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि वादनातील ऊर्जा तरुणांनाही लाजवणारी आहे. दीडशे वर्षांची गौरवशाली परंपरा : आजोबा : नवसू धाकल्या धिंडा वडील : लाडक्या धाकल्या धिंडा भिकल्या धिंडा : वयाच्या १५व्या वर्षापासून धिंडा कुटुंबात तारपा वादनाची परंपरा तब्बल १५० वर्षांची आहे. ही कला केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता, पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम भिकल्या धिंडा सातत्याने करत आहेत. १० फुटी तारपा; धिंडा यांची खास ओळख : साधारणपणे तारपा हे वाद्य बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाते. मात्र, भिकल्या धिंडा यांची खास ओळख म्हणजे ते १० फूट लांबीचा अवाढव्य तारपा अत्यंत सहजतेने वाजवतात. इतक्या मोठ्या तारपासाठी लागणारी फुफ्फुसांची ताकद, श्वासावरचं नियंत्रण आणि कलेवरील प्रभुत्व पाहून प्रत्येकजण थक्क होतो. विशेष म्हणजे, ते केवळ तारपा वाजवत नाहीत, तर स्वतः तारपा तयारही करतात. पालघरच्या आदिवासी संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपणाऱ्या भिकल्या धिंडा यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे केवळ एका कलाकाराचा सन्मान नसून, संपूर्ण आदिवासी संस्कृतीचा गौरव आहे. हे देखील वाचा…. Padma Awards 2026 : रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौरला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर! विश्वविजेत्या कर्णधारांचा मोठा बहुमान Maharashtra Chitrarath : 26 जानेवारीच्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज; पाहा चित्ररथाची खास झलक..! Border 2 : बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’चा रणसंग्राम.! अवघ्या तीन दिवसांत उडवला धुरळा, रविवारी 12 पर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई