BMC election : मुंबईत उमेदवारांची लगबग वाढली; 10 हजारांहून अधिक अर्जांचे वितरण, 44 अर्ज दाखल

BMC election : राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेच्या २२७ जागांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, आतापर्यंत एकूण १० हजार ३४३ अर्जांची (नामनिर्देशन पत्रे) विक्री झाली आहे. मात्र, त्या तुलनेत प्रत्यक्ष अर्ज भरण्याचे प्रमाण कमी असून आतापर्यंत केवळ ४४ उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
गेल्या चार ते पाच दिवसांतील आकडेवारी पाहता मुंबईत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट होत आहे. २३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत शुक्रवारी (२७ डिसेंबर) एकट्या दिवशी १,२९४ अर्जांचे वितरण झाले. राजकीय पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अंतिम टप्प्यात असल्याने आणि अधिकृत उमेदवार याद्या जाहीर होण्यास विलंब होत असल्याने, अनेक इच्छुकांनी अर्ज विकत घेतले असले तरी ते दाखल करण्यासाठी ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतल्याचे दिसते.
विभागांनुसार स्थिती आज झालेल्या कामाचा आढावा घेतल्यास, सर्वाधिक ३५ अर्ज आज सादर झाले आहेत. यामध्ये सी आणि डी विभाग (RO २२) मधून ९, तर एम पूर्व (RO १५) मधून ५ अर्ज प्राप्त झाले आहेत. आजवर दाखल झालेल्या ४४ अर्जांपैकी बहुतांश अपक्ष किंवा छोट्या गटांचे असण्याची शक्यता आहे.
अखेरचे दोन दिवस शिल्लक –
आता अर्ज भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार असे केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. रविवारी सुटी असल्याने इच्छुकांची धावपळ वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली पहिली यादी लवकरच जाहीर करण्याची शक्यता असल्याने, सोमवारपासून मोठ्या राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज मोठ्या संख्येने दाखल होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.





