BMC Election: पहिल्याच दिवशी अर्जांसाठी इच्छुकांची झुंबड; ‘इतक्या’ अर्जांची विक्री

BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, मंगळवारी २३ डिसेंबर रोजी पहिल्याच दिवशी इच्छुकांनी उमेदवारी अर्जांसाठी मोठी गर्दी केली होती. मुंबईतील २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्जांची विक्री झाली असली तरी, एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही.
निवडणूक प्रक्रियेला सुरुवात –
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. आजपासून प्रत्यक्ष अर्ज वितरणाला सुरुवात झाली. ही प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी पालिकेने शहरात २३ स्वतंत्र कार्यालये थाटली आहेत. या कार्यालयांमध्ये आवश्यक कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक –
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २३ ते ३० डिसेंबर (सकाळी ११ ते दुपारी ५). २५ डिसेंबर (नाताळ) आणि २८ डिसेंबर (रविवार) रोजी अर्ज दिले किंवा स्वीकारले जाणार नाहीत. छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून. अर्ज मागे घेणे २ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत). चिन्ह वाटप ३ जानेवारी २०२६.
१५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल –
मुंबईचा ‘भावी नगरसेवक’ कोण ठरणार, याचा फैसला १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानातून होईल. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर केले जातील.
उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरताना आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि शुल्क वेळेत सादर करावे. नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.





