BMC Election : मुंबईसाठी महायुतीचा फॉर्मुला ठरला ! ‘एवढ्या’ जागांवर एकमत तर राष्ट्रवादीचा ‘पत्ता कट’

मुंबई महापालिकेवर (BMC Election) सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने आपली कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी (BMC Election) महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) 227 पैकी तब्बल 150 जागांवर एकमत झाले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) चा पत्ता कट
या जागावाटपात सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) स्थान देण्यात आलेले नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणंघेणं नाही. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याच्यातून ते निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत कुठलेही संबंध ठेवणार नाही. मलिक यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली तर त्यांचे स्वागत आहे,” असे अमित साटम म्हणाले आहेत .
ठाकरे बंधूंवर टीका
मुंबईचा रंग बदलण्याचा आणि मुंबईकरांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांचा या निवडणुकीत पराभव करायचा आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले. मुंबईच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराचा विळखा तोडण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर निकाल १६ जानेवारीला लागणार आहे.
उर्वरित 77 जागांवर खलबतं सुरु
“मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५० जागांवर भाजप-शिवसेनेचे एकमत झालं आहे. उर्वरित ७७ जागांवर पुढच्या दोन दिवसांत चर्चा करुन घोषणा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे. ही मुंबईकरांची इच्छा आहे. त्यामुळे १५० पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईकरांचा महापौर होईल असे अमित साटम म्हणाले.





