कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी ब्लू प्रिंट; रमेश बागवे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

पुणे – कॅन्टोन्मेंटच्या विकासाला गेल्या दहा वर्षांत खीळ बसली आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना व विकासकामे याची ब्लू प्रिंट मी तयार केली असून, निवडून आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी दिली.
याशिवाय मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे सुरू होतील. कॅन्टोन्मेंटचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बागवे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
बागवे म्हणाले की, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन गेली ४० वर्षे मी पुणे शहरात आणि विशेषतः पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात जनसेवेचे काम करत आहे. केंद्रात, राज्यात व पुणे महानगरपालिकेत गेली दहा वर्षे भाजपची सता असूनही कॅन्टोन्मेंटच्या विकासाबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
जीवघेणी वाहतूक कोंडी, कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा, जुन्या घरांचा प्रश्न, अपुरे वाहनतळ, अपुरी सार्वजनिक बससेवा अशा नागरी प्रश्नांसोबतच महिलांची सामाजिक सुरक्षा, वाढती बेरोजगारी, गरिबांसाठी अपुरी आरोग्यसेवा, भाजीमंडई, रिक्षातळ, उद्याने यांची दुरवस्था, असे अनेक प्रश्न असून, ते प्राधान्याने सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रश्न सोडविसाठी आपण अनेक योजना व विकासकामे याची ब्लू प्रिंट तयार केली असून, जुन्या वाड्यांच्या विकासासाठी नवीन धोरण आखून निधी उपलब्ध करणे, अशा नागरी सुविधांबरोबरच तरुण-तरुणींसाठी शाश्वत रोजगार, झोपडपट्टीवासीयांना ५५० चौरस फुटांचे घर मिळावे व मध्यमवर्गीयांच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मिळकतकर रद्द करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही रमेश बागवे यांनी दिली.




