‘टक्कल व्हायरस’नंतर आता बुलढाण्यात ‘या’ आजाराची भीती, 8 दिवसांपासून गावकऱ्यांनी आंघोळच केली नाही

Buldhana Hair loss : बुलढाण्यातील काही गावांमध्ये अनेकांना अचानक टक्कल पडत असल्याचे समोर आले होते. यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मात्र, आता गावकऱ्यांमध्ये केस गळती व टक्कल पडण्यापाठोपाठ नव्या आजाराची भिती निर्माण झाली आहे. बुलढाण्यातील अनेक गावांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोम आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिक वापरत असलेल्या पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढले असल्याने हा आजार पसरू शकतो.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा यासह जवळपास 11 गावातील नागरिकांना केसगळती व टक्कल पडत आहे. जवळपास 90ते 100 नागरिकांना आतापर्यंत टक्कल पडले असून, यामध्ये लहान मुलं, तरूण, वृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागाने या घटनेची दखल घेत त्वरित गावकरी वापरत असलेल्या पाण्याच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली होती.
पाण्याच्या नमुन्यांमध्ये नायट्रेट आणि टीडीएसचे प्रमाण अधिक आढळले आहे. नियमितप्रमाणापेक्षा येथील पाण्यामध्ये जवळपास 5 पट अधिक नायट्रेड आहे. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मागील 8 दिवसांपासून येथील गावकऱ्यांनी अंघोळ देखील केलेली नाही. तसेच, नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने लहान मुलांना ब्लू बेबी सिंड्रोम आजार देखील होऊ शकतो.
ब्लू बेबी सिंड्रोम आजार काय आहे?
ब्लू बेबी सिंड्रोम हा लहान बाळांमध्ये दिसून येणारा आजार आहे. यामध्ये बाळाच्या त्वचेचा रंग निळा पडतो. या आजारामुळे बाळाच्या त्वचेवर परिणाम होतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीर निळसर पडते. तसेच, बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते. ऑक्सिजन प्रवाह सुरळीत सुरू राहण्यासाठी हिमोग्लोबिन महत्त्वाचे असते. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने बाळाच्या वाढीवरही याचा परिणाम दिसून येतो.





