Nagpur Crime : नागपूरच्या पॉश एरियात रक्तरंजित थरार; तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून हत्या

नागपूर : नागरपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना नागपुरमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात घडली आहे. सोशा रेस्टॉरंट’चे मालक अविनाश भुसारी (२८ वर्षे) असं गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. २८ वर्षीय तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आल्याने नागपुरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोकुळपेठ बाजार परिसरातील शोशा लाउंज एंड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी हे रात्री मित्रांसोबत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चार आरोपी दोन मोटरसायकलवरून त्यांच्या जवळ आले. त्यांनी मित्रांसोबत बसलेल्या अविनाशवर सहा राऊण्ड फायर केला व पसार झाले.
गोळीबारानंतर अविनाश भुसारी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. दरम्यान, गँगवॉरच्या जुन्या वैमन्यस्यातून अविनाश भूसारी याची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपींची ओळख पटली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी सांगितले. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हायप्रोफाइल आणि तरुण उद्योजकाची हत्या झाल्यामुळे नागपुरमध्ये खळबळ उडाली आहे.




