पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भव्य रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पवार १२ डिसेंबर रोजी ८६ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त १२ डिसेंबर ते १२ जानेवारी या एक महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागात रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत. या उपक्रमात ८५ हजार रक्त बाटल्या संकलित करण्याचा निर्धार पक्षाने जाहीर केला आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम महत्त्वाची ठरणार आहे, असा पक्षाचा विश्वास आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, डेंगळे पूल, शिवाजीनगर येथे १२ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता या मोहिमेच्या संकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि डॉक्टर सेलचे प्रदेश प्रमुख डॉ. सुनील जगताप यांनी नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. पक्षाच्या वतीने राज्यातील रक्तपेढ्यांना आवश्यक तेवढा रक्तसाठा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवत हा उपक्रम राबवला जाणार असून, पक्ष कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणात भागीदारी अपेक्षित आहे.