पहिल्या दोन टप्प्यांत भाजपला रोखले; उमर अब्दुल्ला यांचा दावा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापण्याची आकांक्षा भाजप बाळगून आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यांत त्या पक्षाला रोखण्यात आमच्या आघाडीला यश आले आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी केला. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीची प्रक्रिया 3 टप्प्यांत होणार आहे.
आतापर्यंत २ टप्प्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा संदर्भ घेऊन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते असणारे उमर बारामुल्ला जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते. दक्षिण आणि मध्य काश्मीरात आघाडीच्या उमेदवारांना अनुकूल ठरणारे मतदान मोठ्या प्रमाणात झाले. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातही तसेच घडण्याची आशा आम्हाला वाटते, असे त्यांनी म्हटले.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजप स्वबळावर लढत आहे. तर, नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने एकत्र येत ४ पक्षांची व्यापक आघाडी बनवली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १ ऑक्टोबरला अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होईल. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील निकाल एकाच दिवशी म्हणजे ८ ऑक्टोबरला जाहीर होतील. आता दोन्ही ठिकाणचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे.





