कराड – मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणाऱ्या जालना येथील आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. महिला आणि लहान मुलांवरही लाठीमार करण्यात आला, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कराड येथील दत्त चौकात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करून, या लाठीमाराचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालन्यात उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शनिवारी कराडच्या दत्त चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन, या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलक तरुणांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. संबंधितांवर दि. 15 सप्टेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या लाठीमाराची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली. जालना येथील पोलीस लाठीमाराची संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटली. त्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कराड येथील दत्त चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यावर आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.