Blind T20 World Cup 2024 | पाकिस्तान ठरला विश्वविजेता, Final मध्ये बांगलादेशचा 10 विकेट्सनं उडवला धुव्वा…

Blind T20 World Cup Final (PAK vs BAN) : पाकिस्तानने अंध टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून, अंतिम सामन्यात बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव करून पाकिस्तानने इतिहास रचला आहे. इतिहासात पाकिस्तानी संघाने हे विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानसाठीही हा विजय संस्मरणीय ठरला कारण संपूर्ण स्पर्धेत त्यांना कोणीही हरवू शकले नाही. या कामगिरीबद्दल पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष सय्यद सुलतान शाह यांनी आपल्या संघाचे अभिनंदन केले आहे.
Congratulations to the Pakistan blind cricket team for clinching the Blind Cricket T20 World Cup title with a 10-wicket win over Bangladesh in the final at Multan Cricket Stadium! 🏆👏 pic.twitter.com/Bd73pijLuU
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 3, 2024
या विजेतेपदाच्या लढतीत प्रथम खेळणाऱ्या बांगलादेशला निर्धारित 20 षटकांत 139 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने एकही विकेट न गमावता अवघ्या 11 षटकांत लक्ष्य गाठून ऐतिहासिक शैलीत विश्वचषक जिंकला. पाकिस्तानकडून कर्णधार निसार अलीने नाबाद 72 धावा केल्या, तर मोहम्मद सफदरने त्याला चांगली साथ देत नाबाद 47 धावांचे योगदान दिले.
अंतिम सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 139 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून आरिफ हुसेनने 52 चेंडूत सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या वतीने बाबर अलीने किफायतशीर गोलंदाजी करत चार षटकांत 24 धावा देऊन 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय मोहम्मद सलमान आणि मतिउल्ला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आतापर्यंत भारताने पटकावले होते सर्व विजेतेपद…
अंध टी-20 विश्वचषक स्पर्धेला 2012 साली सुरुवात झाली, त्यानंतर भारतीय संघाने 2017 आणि पुन्हा 2022 मध्ये पुन्हा विश्वचषक जिंकला होता. अंध टी-20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर भारत यावेळी स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. कारण अंध (ब्लाइंड) टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वादामुळे, भारत सरकारने आपला अंध संघ सीमेपलीकडे पाठवण्यास नकार दिला होता.
दरम्यान, पाकिस्तान आत्तापर्यंत दोनदा अंध टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. 2012 आणि 2017 च्या आवृत्त्यांमध्ये ते भारताविरूध्द अनुक्रमे 29 धावांनी आणि 9 गडी राखून पराभूत झाले होते. आता 2024 मध्ये अखेर पाकिस्तान संघाने पराभवाचा ट्रेंड संपवत पहिले विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले आहे.





