Pakistan: मशिदीजवळ ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकीत स्फोट; 52 ठार

पेशावर – पाकिस्तानातील बलुचिस्तानात मस्तुंग जिल्ह्यात आज एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 52 जण ठार झाले असून 70 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अलफलाह रस्त्यावरील मदीना मशिदीजवीळ इद मिलादून नबी मिरवणुकीसाठी सगळे नागरिक एकत्र जमले असतानाच हा स्फोट घडवून आणण्यात आला, अशी माहिती मस्तुंगचे सहायक पोलीस आयुक्त अताहूल मुनीम यांनी माध्यमांना सांगितले.
ईद मिलाद उल नबीच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्यासाठीच हा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटानंतर येथील रूग्णालयांमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली असून सर्व इस्पितळांतील कर्मचाऱ्यांना, डॉक्टर आणि नर्सना तातडीने कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. स्फोटात एका पोलीस उपायुक्तांचाही मृत्यू झाला आहे. गिश्कोरी असे त्यांचे नाव असून त्यांच्या कारजवळच उभ्या असलेल्या आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला.
बलुचिस्तानचे अंतरिम माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री जान अचकजाई यांच्या म्हणण्यानुसार मदत पथके मस्तुंग येथे रवाना करण्यात आली असून गंभीर जखमींना क्वेट्टा येथे आणले जाते आहे. आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांनी विदेशी शत्रुंच्या मदतीने बलुचिस्तानातील धार्मिक सहिष्णुता आणि शांता नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री अलि मर्दन डोमकी यांनी घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना ताबडतोब अटक करण्याचे आदेश पोलिासांना दिले आहेत.
अंतरिम गृहमंत्री सरफराज अहमद बुग्ती यांनी या स्फोटाची कठोर शब्दांत निंदा केली असून त्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करत शोक व्यक्त केला आहे.
दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो आणि आस्था नसते असे नमूद करून ते म्हणाले की, बचाव कार्यासाठी उपलब्ध असलेल्या सगळ्या साधनांचा वापर केला जातो आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल. दहशतवाद्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच जमीयत उलेमा ए इस्लाम फजलचे नेते हाफीज हमदुल्ला यांच्यासह 11 जण बॉम्बस्फोटात जखमी झाले होते.





