Blackstone Group: ब्लॅकस्टोन समुहाचा भारतातील निवासी रिअॅल्टी क्षेत्रात प्रवेश

मुंबई – जागतिक पातळीवरील प्रायव्हेट इक्विटी फंडात अग्रेसर असलेल्या ब्लॅकस्टोन समुहानेे पुण्यातील कोलते पाटील डेव्हलपर्स मधील 40% भाग भांडवल 1,150 कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अगोदर इतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ब्लॅकस्टोन कंपनीचा भारतातील निवासी रिअॅल्टी क्षेत्रात प्रवेश होणार आहे. 2024 मध्ये भारतात घरांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर हे क्षेत्र अनेकांना खुणावत आहे.
ब्लॅकस्टोनची उपकंपनी असलेली बीआरईपी एशिया 3 हे भाग भांडवल 14.3% व 25.7% अशा दोन टप्प्यात विकत घेणार आहे. यानंतर ब्लॅक स्टोन कंपनी कोलते पाटील डेव्हलपर्सची प्रवर्तक कंपनी होणार आहे. त्यानंतर संयुक्त व्यवस्थापन होणार आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी कोलते पाटील डेव्हलपर्स कंपनी 10 एप्रिल रोजी या व्यवहाराला मान्यता घेण्यासाठी भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा घेणार आहेत. कंपनीच्या डिसेंबर 2024 च्या माहितीनुसार प्रवर्तकाकडे सध्या 69.45% भाग भांडवल आहे. तर 30.55% भाग भांडवल इतर गुंतवणूकदाराकडे आहे. ब्लॅकस्टोन कंपनीने कोलते पाटील डेव्हलपर्सचे भाग भांडवल विकत घेतल्यानंतर या आकडेवारीत फरक होणार आहे.
ब्लॅकस्टोन सध्या भारतातील व्यवसायिक जागाच्या विकसनामधील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी असल्याचे समजले जाते. कार्यालयाच्या जागा, शॉपिंग मॉल आणि डाटा सेंटरमध्ये या कंपनीचे गुंतवणूक आहे.
कोलते पाटील डेव्हलपर्स सध्या व्यावसायिक जागा आणि निवासी जागा विकसनचे काम करतात. या कंपनीचे काम पुणे, बंगळुरू आणि मुंबईत चालते. तिसर्या तिमाहीत कंपनीचा महसूल 349.7 कोटी रुपये होता. तर डिसेंबरअखेर संपलेल्या नऊ महिन्यात कंपनीचा महसूल 998.7 कोटी रुपये होता. तिसर्या तिमाहीत नफा 25.3 कोटी रुपये तर डिसेंबरअखेर संपलेल्या नऊ महिन्यात कंपनीचा नफा 41.3 कोटी रुपये होता. कंपनी 2025 या आर्थिक वर्षात 5,000 कोटी रुपयांच्या मूल्याचे प्रकल्प सुरू करणार आहे. कंपनीने नुकताच 4,000 कोटी रुपये मूल्याचा 22 एकर जागा विकसित करण्याचा संयुक्त प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पात 50 लाख वर्ग फुटाचे काम होणार आहे.
आरईआयटीचा आयपीओ लवकरच
दरम्यान नॉलेज रीअॅल्टी ट्रस्ट या आरईआयटीचे प्रवर्तक असलेल्या ब्लॅक स्टोन आणि सत्व डेव्हलपर्स यांनी शेअर बाजार नियंत्रक सेबीकडे आयपीओ जारी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या माध्यमातून 6,200 कोटी रुपये उभे करण्याचा संकल्प असल्याचे दिसून येते. नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट ही भारतातील सर्वात मोठी आरईआयटी (रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट) असून भारतातील सहा शहरात 37 दशलक्ष वर्ग फूटाचे कार्यालयीन जागाचे बांधकाम झालेले आहे. हे काम बंगळुरू, हैदराबाद, मुंबईसह सहा मोठ्या शहरात चालते.
50 अब्ज डॉलरची गुंतवणूक
ब्लॅकस्टोन समुहाने 2005 मध्ये भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करून आपल्या कामाला सुरुवात केली. आता व्यावसायिक क्षेत्र, आरोग्य, ऊर्जा, डेटा सेंटर आणि तंत्रज्ञान क्षेत्रात या कंपनीने भारतातील विविध प्रकल्पात 50 अब्ज डॉलरचीची गुंतवणूक केली आहे. नजीकच्या काळात ही गुंतवणूक 100 अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. जागतिक पातळीवर ब्लॅकस्टोनच्या नियंत्रणाखालील मालमत्ता 1.1 लाख कोटी डॉलरची आहे.





