पुणे जिल्हा | पालखी मार्गावर ‘ब्लॅक स्पॉट’

वाल्हे, (वार्ताहर) – पुणे-पंढरपूर महामार्गावरील जेजुरी औद्योगिक वसाहत ते नीरा या दरम्यानचा पालखी महामार्ग खड्डेमय झाला असल्याने या पालखी मार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरू आहे.
पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग विस्तारीकरणाचे काम गतीने सुरू असून या नव्याने केलेल्या जेजुरी औद्योगिक वसाहत ते पिसुर्टी फाटा (ता. पुरंदर) या दरम्यानच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनलेला आहे.
ठिक-ठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे,अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र, तरीदेखील या ब्लॅक स्पॉट अर्थात मृत्यूच्या सापळ्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहतीपासून, सुरू झालेल्या नवीन पालखी महामार्गवर अनेक मोठे खड्डे पडले आहेत.दौंडज गावातील श्री भैरवनाथ मंदिरा मागील बाजूच्या मार्गाची पावसाने चाळण झाली आहे.
या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने अरूंद मार्गाने वाहतूक होत असून या परिसरात दुचाकीस्वार घसरून अपघात घडत आहेत.
वाल्हे गावच्या हद्दीत नवीन व जुना पालखी महामार्गाची चाळण झाली आहे. तसेच पिसुर्टी फाट्यापर्यत नवीन पालखी महामार्ग चार पदरी करण्यात आला असून या नवीन केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. या परिसरात रस्ता रूंद असल्याने, वाहनचालक भरधाव वेगात जात आहेत.
मात्र, याच रस्त्यावर खड्डे पडले असल्याने, अनेक भरधाव वाहने या खड्ड्यांत आपटल्याने वाहनांचे तसेच वाहन चालकांचे नुकसान होत आहे.
रस्ता खड्डेमय झाला असल्याने वाहनांचा ताबा सुटून मागील आठवड्यापासून दररोज अपघात घडत असूनदेखील व वारंवार संबंधित विभागाकडे तक्रार करूनदेखील यासंदर्भात कोणतीही दखल घेतली जात नसल्याने या परिसरातील ग्रामस्थ पालखी महामार्गाच्या विरोधात अंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
आंदोलानंतरच जाग येणार का?
पिसुर्टी फाटा ते नीरा शहर या भागातील रस्ता ग्रामस्थांच्या अंदोलनानंतर रूंद करण्यात आला; मात्र नव्याने रूंद केलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे या मार्गावर पडले असून मागील आठवड्यातच या खड्डेमय रत्यामुळे एका दुचाकीस्वारांचा अपघात होऊन मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर दुखापत झाली आहे.
तरीदेखील, संबंधित विभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीच दखल घेऊन, या पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कष्ट घेतले नाहीत.
किमान खड्डे तरी बुजवा
थोपटेवाडी फाटा ते जेऊर फाटा या पालखी मार्गावरील रस्त्यावर चारी खोदून,पाइपलाइन टाकली असून या चारी ठिकाणी दोन-तीन वेळेस निकृष्ट दर्जाच्या कामाने चारी बुजविण्यात आली होती.
मात्र, तरीदेखील या पालखी मार्गावरील चारी भागात समांतर मोठा खड्डा तयार झाला असल्याने अचानकपणे भरधाव वेगात असलेले वाहन या समांतर चारीत आपटून दुचाकीस्वारांचा वाहनावरील ताबा सुटून अनेक अपघात घडत असून देखील अद्यापपर्यंत ठोस व कायमस्वरुपीची उपाययोजना करण्यात आली नाही. पालखी महामार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.





