नगर – अकोले, श्रीरामपूरात खतांचा काळा बाजार

नगर – खरीप हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यात खते, बियाणे आणि किटकनाशकांच्या काळाबाजार यासह अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी कृषी केंद्रा चालकांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. त्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकांमार्फत ६५२ कृषी केंद्राच परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक अकाले तालुक्यात ८७ तर श्रीरामपूर तालुक्यात ८५ परवाने रद्द करण्यात आली आहेत. तर सर्वात कमी कोपरगाव तालुक्यात १५ आणि कर्जत तालुक्यात २५ अस्थपनांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कीटकनाशक विक्रीचे ३ हजार ११८, बियाणांचे ४ हजार ८८९ व खत विक्रीचे ४ हजार ९८ असे एकूण १२ हजार १०५ परवाने वितरित करण्यात आले आहेत. या सर्वांची कृषी विभागाच्यावतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. याठिकाणी बियाणे, खते आणि किटक नाशके यांची माहिती साठा, विक्री आणि शिल्लक मालाची नोंद ठेवणे संबंधीतांना बंधनकारक करण्यात आलेल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी विशेष करून बियाणे आणि खतांच्या खरेदी, विक्री आणि शिल्लक साठ्याच्या नोंदी ठेवल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बियाणे आणि खतांचा काळाबाजार झाल्याचा संशय कृषी विभागाला आहे. यामुळे यातील ६५२ केंद्रांचे परवाने कायम स्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
तहसीलदारांच्या तालुकास्तरीय समितीने शिफारस केल्यानंतर जिल्हाधिकार्यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत परवाना वितरित केला जातो. पूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्यांमार्फत परवाने वितरित केले जात. आता हे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे देण्यात आले आहेत. जिल्ह्यात नोंदणी असणारे अनेक कृषी सेवा केंद्र सातत्याने बंद, हंगामात क्वचितच कधीतरी ठेवणे, भाडोत्री चालवण्यास देणे, यासह काळाबाजार आणि निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांची विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानूसार कृषी विभागाने धडक मोहीम राबवत तालुका पातळीवर १४ तर जिल्हा पातळीवरील १ अशा १५ पथकांमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल पाठवलेल्या परवानाधारकांना नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. सुनावणीमध्ये संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यानंतर परवाने कायम स्वरूपी रद्दची कारवाई करण्यात आली.
तालुकानिहाय आकडेवारी
कीटकनाशकांचे 211 खतांचे 195 व बियाणांचे 246 असे एकूण 652 परवाने कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोले 87 व श्रीरामपूरमध्ये 85 तर राहुरी 66, नगर 63, पारनेर 63, पाथर्डी 26, कर्जत 25, श्रीगोंदे 58, जामखेड 31, शेवगाव 21, नेवासा 28, संगमनेर 51, राहता 33 आणि कोपरगाव तालुक्यात 15 परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे यांनी दिली.





