भाजपच्या पराभवासाठी झटणारे नाहटा पुन्हा शिवसेनेत; एकनाथ शिंदेंचा मुंबईत भाजपला धक्का

मुंबई : नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या मध्यस्थीने शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाहटांना पक्षप्रवेश देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने उपनेते विजय नाहटा यांची शिंदेसेनेतून हकालपट्टी केली होती. नाहटांच्या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी शिंदेसेना करीत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली. यात नाहटा यांना आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर त्यांची पुन्हा उपनेते पदावर नियुक्ती केली आहे. नाहटा यांच्या पक्षप्रवेशामुळ नवी मुंबईतील शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. मंत्री गणेश नाईक यांच्यासमोर नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सांगितले.
विजय नहाटा आधी शिवसेनेतच होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्यासाठी उत्सुक होते. पण त्यादरम्यान भाजपमधून आलेल्या माजी आमदार संदीप नाईक यांना स्वीकारण्यात आले. त्यामुळे विजय नाहटा यांना अपक्ष उमेदवारी लढवावी लागली.
त्यावेळी बेलापूरमध्ये महायुतीच्या मंदा म्हात्रे, महाविकास आघाडीचे संदीप नाईक, मनसेचे उमेदवार गजानन काळे आणि अपक्ष विजय नहाटा अशी लढत पाहायला मिळाली. ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली. अखेरच्या क्षणी मंदा म्हात्रे केवळ 377 मतांनी विजयी झाल्या. नहाटा यांनी तब्बल 19 हजार मते घेतल्याने म्हात्रे यांना विजयासाठी अखेरच्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला होता.
दरम्यान, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत त्यांच्या पराभवासाठी झटणाऱ्या विजय नहाटा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनी भाजपला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.





