Nanded Loksabha ByPoll: नांदेडमध्ये मोठी उलथापालथ; पाच महिन्यांत भाजपने परत मिळवली जागा

नांदेड : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले. महायुतीचा विजयाचा हा पॅटर्न लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत दिसला. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता.
नांदेडमध्ये पोटनिवडणूक
नांदेड लोकसभा मतदार संघात एप्रिल मे महिन्यांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांत वसंत चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण मैदानात होते. तर भाजपकडून डॉ. संतुक हंबार्डे मैदानात होते. त्यात 425574 मते घेत डॉ. संतुक हंबार्डे यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांना 390149 मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला.
मागच्या निवडणुकीत काय झाले होते?
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले होते आणि ते विजयीदेखील झाले होते.





