वसुंधराराजेंना भाजपची चपराक; कट्टर समर्थकाची पक्षातून केली हकालपट्टी

जयपुर – राजस्तानातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे यांचे कट्टर समर्थक व राज्याचे माजी मंत्री डॉ. रोहित्सवकुमार शर्मा यांची आज भाजप मधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून भाजप श्रेष्ठींनी थेट वसुंधराराजे यांनाच दिलेली ही चपराक मानली जात आहे. या कारवाईच्या संबंधात बोलताना डॉ. शर्मा यांनी म्हटले आहे की मी नेहमीच भाजपला आपली आई समजत आलो आहे.
माझ्यावर झालेली ही कारवाई आकसाने केली गेली आहे. मी कोणताही शिस्तभंग केलेला नाही. केवळ मी वसुंधराराजेंचा समर्थक आहे म्हणूनच आपल्यावर ही कारवाई केली गेली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले असून त्यांनी म्हटले आहे की, डॉ शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपासून सतत पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केली आहेत. आणि त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
राजस्तानात भाजपचे राष्ट्रीय नेते व वसुंधराराजे यांच्यात वितुष्ट आले आहे. वसुंधरांकडून राज्याचे नेतृत्व काढून घेऊन ते अन्य नेत्याला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण वसुंधरांच्या समर्थकांनी अशा प्रयत्नांच्या विरोधात सतत आवाज उठवल्याने हे एक अवघड प्रकरण बनले आहे. पण आज त्यांच्या एका समर्थकाला बाहेरचा रस्ता दाखवून भाजपने वसुंधरांनाही एक संदेश दिल्याचे मानले जात आहे.





