“भाजपची संधी नाकारल्याचा पश्चाताप”; शिवसेना आमदाराची थेट एकनाथ शिंदेंवर टीका !

नागपूर – राज्य मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत खदखद वाढली आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकरणी एकनाथ शिंदेंवर उघड नाराजी व्यक्त करत शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेत मागून आलेल्यांना न्याय मिळतो. पण आम्हाला नाही. भाजप प्रवेशाचा आग्रह असताना आम्ही शिवसेनेत आलो त्याचा आता पश्चाताप होत आहे, असे ते म्हणाले आहेत.
मला भाजपात येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी विनंती केली होती. मलाही ते नेते म्हणून आवडतात. पण माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. पण आता येथे आल्यानंतर माझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. भंडारा जिल्ह्यातील शिवसेना केवळ आमच्या ताकदीवर उभी आहे. एवढे मोठे पद असताना अशी वेळ येते तेव्हा नक्कीच मनात अनेक विचार येतात. भविष्यात मी योग्य ती भूमिका घेईन, असेही आमदार भोंडेकर यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षांपूर्वी 10 अपक्ष आमदारांपैकी मी सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. कोणताही स्वार्थ न ठेवता मी त्यांच्यासोबत गेलो. तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता. आपले सरकार आल्यानंतर तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊ. पण त्यानंतरही त्यांनी मला दिलेले वचन पाळले नाही. त्यानंतरही आम्ही त्यांच्यासोबत राहिलो.
पण अडीचवर्षांनंतर पक्षप्रवेशाची वेळ आली तेव्हा आमच्यात पुन्हा चर्चा झाली. मागे मंत्रिपद नाही, महामंडळही दिले नाही. पण आता नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्रीपद देऊ असे शिंदे यांनी मला शब्द दिला. एवढेच नाही तर जाही सभेतही त्यांनी ते बोलून दाखवले. पण प्रत्यक्षात आम्हाला काहीच मिळाले नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनेत प्रामाणिकपणाला किंमत नाही
शिवसेनेत आमच्या मागून आलेल्यांना मंत्रिपदे मिळाली. पण पक्षासोबत प्रामाणिक राहणाऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पदावर राहून काहीच उपयोग नाही. शिवसेनेत नेता, उपनेता हे मोठे पद असते. 6 जिल्ह्यांचे समन्वयक पद आहे. पण कोणतीही चर्चा नाही. कोणतीही विचारपूस नाही. कोणतीही संधी नाही. मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग? त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला, असेही ते म्हणाले.





