मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विजयांचा विक्रम; नक्वी यांनी उडवली कॉंग्रेसची खिल्ली

हैदराबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करताना कॉंग्रेसची खिल्ली उडवली. एकीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप विजयांचे विक्रम रचत आहे. तर, दुसरीकडे कॉंग्रेस पराजयांच्या विक्रमात व्यस्त आहे, असे ते म्हणाले.
देशात स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्रात सलग तिसऱ्यांदा बिगरकॉंग्रेस सरकार सत्तेवर आले आहे. कॉंग्रेसचा पाठिंबा नसलेले किंवा परिवाराच्या रिमोट कंट्रोलवर न चालणारे ते सरकार (मोदी सरकार) आहे. आताचे सरकार यशस्वीपणे सुशासनाच्या मार्गावरून प्रवास करत आहे. त्यामुळे जनादेशाचा आदर करणे, तो स्वीकारणे कॉंग्रेसला अवघड जात आहे.
मोदीविरोधाने ग्रासल्याने कॉंग्रेसचे रूपांतर अकार्यक्षम पक्षात झाले आहे. त्या पक्षाचा जनाधार सध्या व्हेंटिलेटरवर आहे, अशी शाब्दिक टोलेबाजी माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या नक्वी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. भाजपने नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. त्याआधी त्या पक्षाने काही राज्यांची सत्ता काबीज केली. त्याउलट, कॉंग्रेसची त्या निवडणुकांतील कामगिरी सुमार ठरली. तो संदर्भ घेऊन नक्वी यांनी भाजप आणि कॉंग्रेसची तुलना केली.





