भाजपची डोकेदुखी वाढली ! वाराणसी, गोरखपूरमध्ये शेतकरी नेते करणार विरोधात प्रचार

नोएडा -केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारणारे शेतकरी नेते वाराणसी, गोरखपूर आणि प्रयागराज या उत्तरप्रदेशातील तीन जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाआधी ते दौरे होतील. त्यामुळे शेतकरी नेते सत्तारूढ भाजपचे बालेकिल्ले ढवळून काढणार असल्याचे सूचित होत आहे.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन केले. त्या मोर्चाचे प्रमुख सदस्य असणारे राकेश टिकैत, शिवकुमार शर्मा कक्काजी, योगेंद्र यादव आदी शेतकरी नेते उत्तरप्रदेशातील तीन जिल्ह्यांना भेटी देतील.
त्यावेळी ते शेतकऱ्यांच्या विरोधात असणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहन मतदारांना करणार आहेत. अर्थात, विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन ते करणार नाहीत, असे मोर्चाकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढवत आहेत. तर, त्या राज्यातील काही मंत्री प्रयागराजमधील भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणूक काळात होणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या दौऱ्यांचे महत्व वाढले आहे.





