भाजप केंद्रात आणि राज्यात सुद्धा दिसणार नाही

कोरेगाव – केंद्रात आणि राज्यात सरकारची सर्वत्र हुकूमशाही सुरू असून सर्वसामान्यांची गळचेपी केली जात आहे. सर्वसामान्य जनता आता पेटून उठली असून भाजपच्या चारसो पारच्या घोषणेला पूर्णपणे कंटाळली आहे. देशात २३० च्या वर सुद्धा भाजप जाऊ शकणार नाही. सर्वत्र परिवर्तनाची लाट आहे, महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी नेत्रदीपक यश मिळेल. स्व. यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातून सर्वसामान्यांची तुतारी संसदेत निश्चितपणे वाजेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे, तालुकाध्यक्ष एडवोकेट श्रीकांत चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, माजी सदस्य प्रतिभा बर्गे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम, किशोर नानासाहेब बर्गे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, शहरप्रमुख अक्षय बर्गे, अमरसिंह बर्गे, नगरसेवक प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, नवनाथ बर्गे यांच्या सहप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसामान्य जनता महिला आणि युवकांनी ही निवडणूक हातात घेतली असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप या निवडणुकीत यश मिळवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ॲड. विजयराव कणसे, दिनेश बर्गे, प्रतिभा बर्गे, संजय पिसाळ, पी. एस. पवार सर, सी. आर. बर्गे, अमरसिंह बर्गे, प्रीतम बर्गे, अशोक भोसले आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. गणेश होळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. किशोर नानासाहेब बर्गे यांनी आभार मानले. यावेळी विविध पक्ष संघटना आणि आघाडीच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी पत्रे देण्यात आली. कार्यक्रमास इंडिया महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
घोटाळा केला असता तर येथे दिसलो नसतो
आमदार शशिकांत शिंदे यांनी तडाखेबंद भाषण करत विरोधकांवर जोरदार टीका केली. मी जर मुंबई बाजार समितीत घोटाळा केला असता तर आज तुमच्यात दिसलो नसतो. मी अन्य घोटाळेबाजांप्रमाणे भाजपमध्ये गेलो असतो, अशी कोपरखळी मारत आमदार शशिकांत शिंदे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या भाजपच्या हुकूमशाही कारभाराचा पर्दाफाश केला.





