Nitesh Rane – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याची तयारी मंत्री नितेश राणे यांनी दाखवली आहे. जिल्ह्यात आमची युती झाली तर उबाठा आणि महाविकास आघाडीला रेडिमेड उमेदवार मिळतील. उबाठा किंवा महाविकास आघाडीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवार नाहीत. ते आमची युती केव्हा होते आणि बंडखोरी होऊन आपल्याला उमेदवार केव्हा मिळतील हे बघत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वबळावर लढावे, असे नितेश राणेंनी म्हटले आहे. तसेच, दुसऱ्यावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढाव्यात, असे आवाहन राणेंनी महायुतीतील कार्यकर्त्यांना केले आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणुका लढ्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे, असे म्हणत राणेंनी एकप्रकारे स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, भाजपचा हा स्वबळाचा नारा म्हणजे शिंदेंना दे धक्का असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यातील आणखी कोणत्या जिल्ह्यात राबवला जाईल, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले असून राजकीय पक्ष युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पक्षातील प्रमुख नेत्यांनी म्हटले आहे.