बंगालमध्ये तिरंगी लढत झाल्यास भाजपला लाभ..

नवी दिल्ली -तृणमूल कॉंग्रेस स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यास पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होईल. तशा स्थितीत भाजपला लाभ होऊ शकतो, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
देशभरात भाजपचा मुकाबला समर्थपणे करण्यासाठी अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. बंगालमध्ये त्या आघाडीचे प्रतिनिधित्व कॉंग्रेस, तृणमूल आणि डावे पक्ष करत होते. मात्र, स्वबळावर लढण्याची घोषणा करून तृणमूलने तूर्त तरी त्या आघाडीतून अंग काढून घेतले आहे. तृणमूलने निर्णय कायम ठेवल्यास कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचीच आघाडी अस्तित्वात राहील.
त्यातून तृणमूल, भाजप आणि कॉंग्रेस-डाव्या पक्षांची आघाडी अशी तिरंगी लढत त्या राज्यात अनुभवयास मिळेल. इंडियाचे घटक म्हणून कॉंग्रेस, तृणमूल आणि डावे पक्ष एकजुटीने लढल्यास भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहू शकते. मात्र, ते पक्ष विखुरल्यास त्यांच्यातील मत विभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकते.
मागील लोकसभा निवडणुकीत (वर्ष २०१९) तृणमूल, भाजप, कॉंग्रेस आणि डावे पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने बंगालमध्ये चौरंगी लढत झाली. त्या निवडणुकीत फायदा झालेल्या भाजपला ४२ पैकी १८ जागा मिळाल्या. तृणमूलने सर्वांधिक २२ जागा पटकावल्या. कॉंग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले. तर, डावे पक्ष खातेही उघडू शकले नाहीत.





