निशांत कुमार यांच्या राजकारण प्रवेशाचे भाजपकडून स्वागत

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या राजकारणात प्रवेशाबाबत चर्चा वाढल्या आहेत. यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर ते राजकारणासाठी योग्य असतील आणि राजकारणात येऊ इच्छित असतील तर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे स्वागत करतो.
राजकारणात घराणेशाहीची व्याख्या अशी आहे की तोंडात चांदीचा चमचा असलेली व्यक्ती जेमतेम १८ वर्षांची होते आणि राजा बनण्याची तयारी करू लागते अशी टिप्पणीही त्यांनी केली. जयस्वाल म्हणाले की नितीश कुमार एक चांगले पिता आहेत. इतक्या वर्षांपासून म्हणजेच २० वर्षांपासून बिहारची सूत्रे सांभाळत आहेत.
याआधी त्यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवले आहे. आम्ही जेंव्हा लहान होतो त्यावेळी ते सक्रिय राजकारणात शिखरावर होते.असे असूनही त्यांनी आपल्या मुलाला राजकारणात आणले नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना दिलीप जयस्वाल म्हणाले की, जेव्हा मी बोलतो तेव्हा लोक म्हणतात की मी खूप जास्त बोलतो.
विरोधकांची मुले अजून मोठी झालेली नाहीत आणि त्यांनी मुलांसाठी खुर्च्या तयार करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यातील आणि नितीश यांच्यातील हा फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, इतक्या मोठ्या राजकीय विचारसरणीच्या वडिलांच्या मुलाने आता नक्कीच राजकारणात प्रवेश केला पाहिजे.





