Rajasthan : …त्यामुळे भाजप पक्ष प्रचंड अस्वस्थ झालाय – सचिन पायलट

जयपूर :– राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा प्रचंड यशस्वी झाली असून या यात्रेमुळे भारतीय जनता पार्टी अस्वस्थ झाली असल्याचा दावा कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला आहे.
एका इंग्रजी वाहिनीशी याबाबत बोलताना पायलट म्हणाले की, कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या यात्रेने अनेक राज्यांचा प्रवास करत आता राजस्थामध्ये प्रवेश केला असून आम्ही सगळे स्वागत करत आहोत. केवळ कॉंग्रेसजनच नाही तर ज्या प्रकारे राज्यातील सर्वसामान्य नागरिक यात्रेचे स्वागत करत आहेत ती बाब आमच्यासाठी खास आहे. केवळ दक्षिण भारतात ही यात्रा सफल होईल आणि उत्तर भारतात आल्यावर यात्रेचा प्रभाव कमी होईल असा दावा आमच्या विरोधकांनी केला होता तो चुकीचा ठरला आहे.
उलट यात्रेच्या प्रत्येक टप्प्यात मिळणारा पाठिंबा वाढत गेला आहे. तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात लाखो नागरिक यात्रेशी जोडले गेले. यात्रेला इतका पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीने केली नव्हती त्यामुळे हा पक्ष प्रचंड अस्वस्थ झाला असल्याचा दावा पायलट यांनी केला. राहुल आतापर्यंत 2250 किमी अंतर पायी चालले असून शेतकरी, कामगार, मासेमार, तरूण, माजी सैनिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचेच राहुल यांना समर्थन मिळत असल्याचे ते म्हणाले.
महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा, मोडणाऱ्यास राज्याबाहेर हाकलून लावा – संभाजीराजे
दरम्यान, राजस्थान कॉंग्रेसमध्ये पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील संघर्ष जगजाहीर झाला असताना पायलट यांनी मात्र भाजपमध्येच दुफळी असल्याचा दावा केला आहे. भाजप नेते पदाच्या मागे धावत असल्याचा दावा करतानाच जयपूरच्या त्यांच्या सभेला फारच कमी लोकांनी प्रतिसाद दिला असे पायलट म्हणाले.





