तामीळनाडूतील सर्वपक्षीय बैठकीपासून भाजप राहणार दूर

चेन्नई – लोकसभा मतदारसंघांच्या संभाव्य फेररचनेवरून तामीळनाडूतील राजकारण तापले आहे. त्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी ५ मार्चला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र, त्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
स्टॅलिन यांनी फेररचनेमुळे तामीळनाडूतील लोकसभेच्या जागा ८ ने घटण्याची शक्यता वर्तवली आहे. जागा घटल्यास संसदेतील तामीळनाडूचे प्रतिनिधित्व कमी होईल. राज्याचा आवाज क्षीण होईल. तामीळनाडूने लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. मात्र, त्याचा राजकीय फटका बसू शकतो. राज्यात सध्या लोकसभेच्या ३९ जागा आहेत. त्यांची संख्या ३१ पर्यंत खाली जाऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यातून तामीळनाडूच्या हितासाठी एकवटून सर्व पक्षांनी एकमुखी भूमिका घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
मात्र, त्या बैठकीत भाजप सहभागी होणार नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के.अन्नामलाई यांनी स्पष्ट केले. स्टॅलिन काल्पनिक भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघ फेररचना होणार असल्याचे कुठून समजले ते स्टॅलिन यांनी स्पष्ट केलेले नाही. फेररचनेच्या प्रक्रियेत कुठल्याही राज्यावर अन्याय होणार नसल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.





