कोलकता – तृणमूल कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन यात्रा काढण्यास भाजप सज्ज झाला आहे. त्या राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. तो रणसंग्राम विचारात घेता यात्रा राजकीय गेमचेंजर ठरण्याची आशा भाजपला वाटत आहे. बंगालमधील निवडणूक एप्रिल-मेमध्ये अपेक्षित आहे. त्यासाठीची घोषणा मार्चच्या मध्यात होऊ शकेल. यावेळच्या निवडणुकीला आणखी ताकदीने सामोरे जाण्याच्या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे १ मार्चपासून सुरू होणाऱ्या परिवर्तन यात्रेचे महत्व वाढले आहे. यात्रेच्या माध्यमातून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते बंगालमधील ५ हजार किलोमीटरचा पल्ला गाठतील. त्या यात्रेकडे जनसंपर्क मोहीम आणि पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठीचे अभियान म्हणून पाहिले जात आहे. यात्रेच्या माध्यमातून बंगालमधील १ ते दीड कोटी जनतेशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एकाच वेळी ९ यात्रा निघतील. यात्रेच्या प्रारंभावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन आणि इतर प्रमुख नेते उपस्थित असतील. यात्रा १० मार्चला समाप्त होईल. यात्रेच्या सांगतेवेळी कोलकत्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होईल. त्यामुळे बंगाल ढवळून काढण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे सूचित होत आहे. त्या राज्यात सलग १५ वर्षांपासून तृणमूल सत्तेत आहे. प्रदीर्घ काळ सत्तेत असल्याने त्या पक्षाला प्रस्थापितविरोधी स्थिती अडचणीत आणू शकेल. त्यामुळे यावेळी बंगालची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास भाजपला वाटत आहे. आगामी निवडणुकीत तृणमूल विरूद्ध भाजप अशीच मुख्य लढत होण्याचा अंदाज आहे.