Maharashtra Election: ‘महायुती’त ‘इतक्या’ जागांवर तिढा सुटलेला नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी केले स्पष्ट

मुंबई – एकीकडे महायुतीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला नसताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की, “90-90-90 हा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा हास्यास्पद आहे.
काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय फॉर्म्युला तयार करतात? त्यांच्या राहुल गांधींनी झापले परत, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. तसेच ते महायुतीच्या जागावाटपाबाबत ते म्हणाले की, 7 ते 8 जागांवरचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर चर्चा करून उद्या किंवा परवापर्यंत कोणाला किती जागा मिळणार? याबाबत अधिकृतरीत्या जाहीर करू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष आणि आमचे मित्रपक्ष, आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत. जिथे आम्ही जिंकू शकतो, तिथे आम्ही लढू. एकनाथ शिंदे जिथे जिंकू शकतात, तिथे ते लढतील. आपली आपली पक्षाची जी काही उंची आहे, त्याप्रकारे आम्ही लढणार आहोत. त्यामुळे लहान भाऊ, मोठे भाऊ सर्व सोबत आहोत.
आमच्याकडे सगळे व्यवस्थित आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यानंतर त्यांना मनसेबद्दल विचारले असता म्हणाले की, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत विकसित भारताच्या संकल्पनेला साथ दिली. पण त्यावेळेस त्यांनी जाहीर केले होते की, विधानसभेत ते स्वतंत्र लढणार आहेत. राजकीय मतभेद राहू शकतात, पण त्यांच्यांशी आमचे चांगले संबध आहेत.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.





