भाजपने कंगनाची हकालपट्टी करावी; काँग्रेसने केली मागणी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाविषयी खासदार कंगना राणावत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने असहमती दर्शवली. खरोखर असहमत असल्यास भाजपने कंगना यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली. त्यामुळे कंगना यांना लक्ष्य करतानाच भाजपला घेरण्यासाठी कॉंग्रेस सरसावल्याचे स्पष्ट होत आहे.
कंगना यांनी शेतकऱ्यांविषयी जे शब्द वापरले; तसे आजवर कुठल्याच नेत्याने वापरलेले नाहीत. सध्या हरियाणात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये भाजपचा पराभव निश्चित मानला जातो. त्या स्थितीचा विचार करून भाजपने कंगना यांच्या वक्तव्याविषयी असहमती दर्शवली, असे टीकास्त्र कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत सोडले.
अमेरिका आणि चीन हे देश भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे कारस्थान रचत असल्याचा दावाही कंगना यांनी केला. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवे. संबंधित दाव्यात तथ्य आहे का ते परराष्ट्र आणि गृह मंत्रालयांनी सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. परकी शक्ती भारतात अस्थिरता निर्माण करत असतील; तर केंद्रातील सरकारला दुबळे मानावे लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.





