भाजप- शिवसेना अंतर्गत धुसफूसची चर्चा; शरद पवारांंच्या प्रदेशाध्यक्षांनी टायमिंग साधलं, राज्यात मोठा राजकीय भूकंप? म्हणाले…

Shashikant Shinde : सध्या राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा माहोल आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सर्वच पक्षातील उमेदवारांकडून केला जात आहे. ही निवडणूक स्थानिक पातळीवरील असल्याने महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जात निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरले आहेत.
मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत धूसफूस कोणत्या ना कोणत्या कारणाने समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. येथील कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची युती झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहेत.
राज्यभरात सध्या अनेक युत्या होत आहेत. मात्र, कुर्डूवाडीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेली आमची युती महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी देखील ठरू शकते, असे मोठं वक्तव्य शशिंकात शिंदे यांनी केले आहे. कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या प्रचारासाठी आले असता शिंदेंनी हे वक्तव्य करून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विचार करण्यास भाग पाडले आहे. तसेच प्रचार सभेत बोलताना विविध मुद्यांवर भाष्य करताना काही लोक हे फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात, अशा शब्दांत शिंदेंनी भाजपला सणसणीत टोला लगावला. आपण सर्व साधी माणसे आहोत. पण लढणारी माणसे कधीच शरणागती घेत नसतात, असेही शशिकांत शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी?
गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेना यांच्यात वाद सुरू असून या वादातूनच राज्यातील नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदे गटाने भाजपच्या विरोधात मोहिम राबवित विरोध पक्षांशी हातमिळवणी करत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपकडून देखील शिंदे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या सगळ्या वादात शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य महाराष्ट्रात आगामी काळात नवे राजकीय समीकरण पाहायला मिळणार असल्याचे आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे.





