भाजप-शिंदेसेनेची युती फळाला! नगर जिल्ह्यातील राहातामध्ये सर्वच जागांवर दणक्यात विजय; विरोधकांचा सुपडा साफ

खरंतर नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन मातब्बर नेत्यांना मानणारा मोठा वर्ग असून, दरवेळी निवडणुकीत या दोन गटांमध्ये मोठी रस्सीखेच होत असते. यंदाची राहाता नगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्वाची ठरली आहे. विखे पाटील पिता-पुत्र भाजपमध्ये गेल्यानंतर थोरात आणि विखे असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला.
येथून लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांचे पूत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील पराभूत झाले होते. इथून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी बाजी मारून ते खासदार झाले. त्यांना निवडून आणण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी संपूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा विखे पाटलांनी संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीत काढला होता. बाळासाहेब थोरातांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता राहाता नगपालिकेच्या निवडणुकीत भाजप सेनेच्या ताकदीने विरोधकांना नाकीनऊ आणत दणदणीत विजय मिळवला आहे.
याशिवाय नेवासा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल देखील लक्ष वेधून घेणारा ठरला असून, नेवासा नगर पंचायत निवडणुकीत गडाखांनी बाजी मारली आहे. 17 पैकी 10 जागा गडाखांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाला मिळाल्या आहेत. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.





