Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर करून आघाडी घेतली आहे. या निवडीमध्ये भाजपने जातीपातीचे समीकरण आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असून, अनेक दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धक्कातंत्र पुन्हा एकदा अवलंबले आहे. पक्षाच्या केंद्रीय संघटनेत सरचिटणीस म्हणून प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या विनोद तावडे यांना भाजपने पुन्हा मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा संसदेत घेण्याचा पक्षाचा विचार आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देऊन भाजपने आपला मित्रपक्ष आणि दलित मतांचा आधार कायम ठेवला आहे. नागपूरच्या नवनिर्वाचित नगरसेविका आणि आदिवासी समाजाचा चेहरा असलेल्या माया ईवनाते यांची उमेदवारी सर्वात धक्कादायक मानली जात आहे. विदर्भातून नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा असताना, भाजपने ईवनाते यांना संधी देऊन आदिवासी कार्ड खेळले आहे. तर मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते आणि माजी विधान परिषद सदस्य वडकुते यांना उमेदवारी देऊन भाजपने माधवं (माळी, धनगर, वंजारी) फॉर्म्युला पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेकडून या निवडणूकीत १ जागा मिळणार असून त्याठिकाणी माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव या जागेसाठी निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. आघाडीत अजूनही रस्सीखेच सुरुच आघाडीकडे एक जागा निवडून आणण्याइतपत संख्याबळ आहे. काँग्रेस आणि ठाकरेसेने या जागेवर दावा केला असला, तरी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. संजय राऊत यांनी पवारांच्या ज्येष्ठतेचा हवाला देत त्यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे.