Chandrakant Khaire : भाजपकडून राज्यपाल तर शिंदेकडून देण्यात आली ‘ही’ ऑफर; माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : मला अनेकदा ऑफर आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीही बडे नेते बोलले होते. शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपकडून राज्यपालपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. पण मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मी माझ्या एकनिष्ठतेला तडा जाऊ देणार नाही, असेही खैरे यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून आमिष दाखवले जात आहे. या सर्व घडामोडींवर भाष्य करताना चंद्रकांत खैरेंनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. आमचे शिवसैनिक कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर महापालिका आम्ही आणणार म्हणजे आणणारच, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.
मातोश्रीचा माझ्यावर विश्वास
मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतोय, करत राहीन. जरी काही लोक माझ्याविरोधात काड्या करणारे तिथे पोहोचले असले तरी मी काम करत असतो. माझा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे. मातोश्रीचा माझ्यावर विश्वास आहे. मी अनेक वर्षापासून एकनिष्ठ आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीआधी उमेदवार मिळत नव्हता, तेव्हा शिंदे गटाकडून शिरसाट यांनी काही लोकांना पाठवले होते. आमच्याकडे त्यांना घेऊन या असे सांगितले, असे दावाही त्यांनी केला.
शिंदेंना स्वतःच्या थोबाडीत मारल्यासारखे होईल
चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस एकत्रित येऊ शकतात का? यावरही प्रतिक्रिया दिली. राजकारणात काहीही होऊ शकते. एकनाथ शिंदे आता हळूहळू बाजूला चाललेत. दोन्ही नेते आहेत. उद्धव ठाकरे खूप बुद्धिवान आहेत. हे सगळे फाटाफूट करून चाललेत. त्यांना स्वत:च्या थोबाडीत मारल्यासारखे होईल, असे ते म्हणाले.





