BJP News : भाजप नगरसेवकांची बस हॉटेलच्या भिंतीला धडकली; अतिउत्साह पडला महागात
नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका किंवा क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी भाजपकडून (BJP News) आपल्या नगरसेवकांना 'हॉटेल पॉलिटिक्स' अंतर्गत सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.

BJP News : नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका किंवा क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी भाजपकडून (BJP News) आपल्या नगरसेवकांना ‘हॉटेल पॉलिटिक्स’ अंतर्गत सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
याच दरम्यान नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. भाजप नगरसेवकांना सहलीसाठी घेऊन जाणाऱ्या बसचे स्टेअरिंग शहराध्यक्षांनी स्वतःच्या हातात घेणे त्यांच्या चांगलेच अंगाशी आले असून, बस थेट हॉटेलच्या भिंतीला धडकल्याची (BJP News) घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजप मतदारांना (नगरसेवकांना) ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर नेण्याची तयारी सुरू होती. सर्व नगरसेवक बसमध्ये बसले असतानाच, भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांना अचानक अतिउत्साह आला. त्यांनी थेट बसच्या चालकाला सीटवरून खाली उतरवले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून बसचे स्टेअरिंग हातात घेतले.
मात्र, त्यांनी बस सुरू करताच त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि अनर्थ घडला. ती लक्झरी बस हॉटेलच्या आवारातील भिंतीला जाऊन जोरात धडकली. या धडकेत बसचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने सर्व नगरसेवक सुरक्षित आहेत, मात्र या प्रकारामुळे काही काळ हॉटेल परिसरात प्रचंड गोंधळ आणि घबराट निर्माण झाली होती.
पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘व्हीप’ जारी
या अपघातापूर्वी नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपच्या सर्व मतदार नगरसेवकांना एकत्र करण्यात आले होते. निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने मतदानात कोणतीही चूक होऊ नये म्हणून शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून सर्व नगरसेवकांना पक्षाचा ‘व्हीप’ (आदेश) बजावण्यात आला.
विशेष म्हणजे हा व्हीप बजावला जात असताना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. व्हीप बजावण्याची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या नगरसेवकांना भिवंडीकडे रवाना करण्यात आले.
रिंगणात एकच उमेदवार, तरीही ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ का?
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांनी आपला प्रचार थांबवला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे नरेंद्र दराडे हे एकमेव प्रमुख उमेदवार उरले आहेत. विजयासाठी आवश्यक असलेले पूर्ण बहुमत हातात असूनही महायुतीला मात्र आपल्या नगरसेवकांवर पूर्ण विश्वास नसल्याचे चित्र आहे. कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून महायुतीने ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा अवलंब केला आहे.
यापूर्वी १३ जून रोजीच शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेवकांना नाशिकमधून हलवून ठाण्यातील भिवंडी येथील एका सुरक्षित रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. आता त्याच रिसॉर्टवर भाजपच्या नगरसेवकांनाही पाठवले जात आहे. मात्र, शहराध्यक्षांच्या अतिउत्साहामुळे झालेल्या या अपघाताची चर्चा आता नाशिकसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.






