BJP MLC Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दोन राज्यात 10 उमेदवारांची यादी जाहीर
BJP MLC Election 2026 : यूपी-बिहार विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने १० उमेदवारांची यादी जाहीर केली. नवल किशोर यादव, एन.के. यादव, केदार नाथ सिंह यांच्यासह प्रमुख उमेदवारांची संपूर्ण यादी जाणून घ्या.

BJP MLC Election 2026 : बिहार आणि उत्तर प्रदेशातील २०२६च्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) १० उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. बिहारमधून नवल किशोर यादव, डॉ. एन.के. यादव यांच्यासह चार जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशातील सहा मतदारसंघांसाठी केदार नाथ सिंह, दिनेश गोयल, अशोक कुमार राठौर यांच्यासह सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
बिहारमधील चार उमेदवार
भाजपने बिहारमधील चार विधान परिषद मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
पटना शिक्षक मतदारसंघ : नवल किशोर यादव
कोसी पदवीधर मतदारसंघ : डॉ. एन.के. यादव
दरभंगा पदवीधर मतदारसंघ : सर्वेश कुमार
तिरहुत शिक्षक मतदारसंघ : नरेंद्र प्रसाद सिंह
उत्तर प्रदेशातील सहा उमेदवार
उत्तर प्रदेशातील सहा मतदारसंघांसाठी भाजपने पुढील उमेदवार जाहीर केले आहेत.
वाराणसी पदवीधर : केदार नाथ सिंह
मेरठ पदवीधर : दिनेश गोयल
इलाहाबाद-झांसी पदवीधर : अशोक कुमार राठौर
वाराणसी शिक्षक : डॉ. प्रमोद मिश्रा
आगरा शिक्षक : इंजिनिअर हरि किशोर तिवारी
गोरखपूर-फैजाबाद शिक्षक : ध्रुव त्रिपाठी
BJP releases a list of candidates for MLC elections in Bihar and Uttar Pradesh. https://t.co/tUolvdcwlf
— ANI (@ANI) September 29, 2026
भाजपच्या या घोषणेनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशातील विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील मतदार आपल्या प्रतिनिधीची निवड करतात.
२३ ऑक्टोबरला विधान परिषद निवडणूक
उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यामध्ये पाच पदवीधर आणि सहा शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरला अधिसूचना जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी आणि ९ ऑक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
२३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. २७ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. संबंधित विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबरला संपत आहे.
उत्तर प्रदेशात राज्यसभेच्याही १० जागांसाठी निवडणूक
उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठीही निवडणूक होणार आहे. या जागांसाठी १६ ऑक्टोबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबरला संपत आहे. यापैकी आठ जागा सध्या भाजपकडे, तर प्रत्येकी एक जागा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडे आहे. दिनेश शर्मा यांनी अंडमान-निकोबारचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांची जागा आधीच रिक्त आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेतील सध्याच्या संख्याबळामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्षाच्या भूमिकेला महत्त्व आहे. दोन्ही पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासह निवडणूक रणनीतीवर चर्चा सुरू आहे.
विधान परिषदेतील ११ सदस्यांचा कार्यकाळ संपणार
उत्तर प्रदेश विधान परिषदेतील ११ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचे अवनीश कुमार सिंह, मानवेन्द्र प्रताप सिंह, दिनेश कुमार गोयल, उमेश द्विवेदी, श्रीचंद शर्मा आणि हरि सिंह ढिल्लों यांचा समावेश आहे.
समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव, आशुतोष सिन्हा आणि डॉ. मान सिंह यादव, तसेच अपक्ष आकाश अग्रवाल आणि ध्रुव कुमार त्रिपाठी यांचा कार्यकाळही संपत आहे.





