“मी जेव्हा लायक वाटेल तेव्हा पक्ष…” ; आणखी एका नाराज भाजप आमदाराने बोलून दाखवली खदखद

BJP MLA Sanjay Kelkar। राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही नवीन नेत्यांना संधी तर काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान याच नाराज मंत्र्यांमधील नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अशात ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी देखील मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने बड्या नेत्यांवर खोचक भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे.
“मी जेव्हा लायक वाटेल तेव्हा पक्ष…” BJP MLA Sanjay Kelkar।
सलग तिसऱ्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय केळकर हे भाजपाकडून विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी जोरदार चर्चा होती. पण हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. यानंतर आता केळकरांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल खदखद व्यक्त केली आहे. यावेळी मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, “शेवटी पक्ष आणि पक्षाचे केंद्रीय व राज्य नेतृत्त्व निर्णय घेत असते. त्यांना कदाचित मी लायक वाटलो नसेन त्याच्यामुळे नाही घेतले. मी पक्षाचे स्थापनेपासून काम करत आहे. त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर कधी आमदार, मंत्री व्हायचेय असा कोणता विचार नव्हता. त्यामुळे मी जेव्हा लायक वाटेल तेव्हा पक्ष जबाबदारी देईल. तीन वेळा आमदार झालो आणि वरच्या सभागृहातही होतो. त्यामुळे पक्षाला ज्या-ज्या वेळेला वाटते त्या-त्या वेळेला पक्ष जबाबदारी देत असतो. “असे त्यांनी म्हटले आहे.
महायुतीतील सर्व पक्षाकडून धक्कातंत्र BJP MLA Sanjay Kelkar।
दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये महायुतीतील सर्वच पक्षांनी धक्कातंत्र वापरल्याचे पाहायला मिळाले. यात भाजपाने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) छगन भुजबळ व दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून डावलल्याचे पाहायला मिळाले. यातील काहींनी उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी शांत राहणे पसंत केले. अशात आणखी काही आमदारांना मंत्री होण्याची आशा होती त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते.





