Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचा समावेश करावा’, भाजपच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

BJP MLA Pravin Datke on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या विजयात या योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता भाजप आमदाराने या योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना देखील मिळावा अशी मागणी केली आहे. भाजपचे मध्य नागपूर विधानसभेचे आमदार प्रवीण दटके यांनी ही मागणी केली आहे.
सध्या 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहिना 1500 रुपये दिले जातात. या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार असून, रक्कमेचा पुढील हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
सरकारने महिलांचा सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. आता लाडकी बहीण योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा देखील समावेश करावा, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी करताना दटके म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना आणली. महिलांना बसमधून प्रवास करण्यासाठी सवलत देण्यात आली. मुलींचे उच्च शिक्षण मोफत केले. आता लाडकी बहीण योजनेंतर्गत तृतीयपंथीयांचा देखील समावेश करावा.
दरम्यान, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.





