BJP MLA Crime : भाजप आमदाराकडून बँक मॅनेजरला शिवीगाळ, व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

जालना : भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांनी जालन्यातील जामखेड येथील युनियन बँकेच्या मॅनेजरला फोनवरून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लिप तीन दिवसांपूर्वीची असल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
जालना जिल्ह्यातील जामखेड येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे मॅनेजर ललित शिर्लेकर यांच्याशी आमदार नारायण कुचे यांचा फोनवरून संवाद झाला. या संवादादरम्यान कुचे यांनी मॅनेजरवर अपशब्दांचा वर्षाव केल्याचा आरोप आहे. हा संवाद रेकॉर्ड झाला आणि त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. या क्लिपमुळे कुचे यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्यांच्या या कृतीची सर्वत्र निंदा होत आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय संभाषण झालं?
आमदार कुचे — हॅलो, मॅनेजर साहेब आवाज येतोय आपल्याला?
बँक मॅनेजर -हो सर नमस्कार.
आमदार कुचे ::- तुम्ही राव आमचं काम ऐकत नाही.. माझ्या पद्धतीने तुमच्या ऑफिसमध्ये बँकेत यावं लागेल मला..
बँक मॅनेजर :- सर ते आपल्या हातात नाही ना, मी हेड ऑफिसला त्यांची रिक्वेस्ट पाठवली आहे, रिक्वेस्ट लेटर..
आमदार कुचे :- एवढी मस्ती आलेला मॅनेजर मी कधी पाहिला नाही…
बँक मॅनेजर ::- ते सर थकीत असल्यामुळे, त्यांचे खाते फ्रीज आहे.
आमदार कुचे ::- “तुम्हाला एवढी मस्ती असेल तर नीट करायला मी लय पक्काय, एवढा माज ,एफ डी वाल्याला त्रास, ग्राहक सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास आहे का तुमचा.
“जसं काय तुमच्या बापाचा आहे. तुम्ही सरकारच्या जीवावर जितू राहिले. आम्ही सरकारचे प्रतिनिधी एवढा मात चढला आहे का तुम्हाला..?
आमदार कुचे ::- तूला तीनदा समजून सांगितले..#####दुसरा फोन आहे हा..
बँक मॅनेजर :- सर मी पाठवले आहे त्यांचे लेटर वरती..
आमदार कुचे ::-काय पाठवलं?#####नीट शिफारस कर ना.. जरा दाखवू का तुला.. रेकॉर्डिंग करून टाक तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली.
बँक मॅनेजर::- थकीत वाल्यांचे हेड ऑफिस वरून लॉक होत असतं, तिथून निघत असतं. त्यांचा अर्ज फॉरवर्ड केलेला आहे सर.
आमदार कुचे ::- “मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं नाही ऐकलं तर मी हाताने समजून सांगतो आल्यावर.. तुमची इच्छा असेल तिथे तर..
बँक मॅनेजर::- पाठवले आहे सर वाटल्यास मी तिथला पण नंबर देतो. माझ्या ऑफिसचा..
आमदार कुचे ::– रोहित धुळे म्हणून आहे त्याला ग्राहक सेवा केंद्र पाहिजे ते करून द्या तिथे.
बँक मॅनेजर ::- – हा हा हो सर…
आमदार कुचे:- – ग्राहक सेवा केंद्र करून द्या त्याचं.
पाठवतो मी त्याला आणि ते बँकेचे मार्गी लावा..
बँक मॅनेजर::- ठीक आहे सर
ऑडिओ क्लिपमुळे राजकीय गोंधळ
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे विरोधकांना सरकार आणि भाजपला लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. स्थानिक नागरिक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्येही या घटनेबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. आमदारासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा वापरली जाणे अयोग्य असल्याची टीका होत आहे. यामुळे नारायण कुचे यांच्यासह भाजपची प्रतिमा डागाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर नारायण कुचे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबतही त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे त्यांच्यासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.





